बार्शीत गुटखा रॅकेटवर पोलिसांचा मोठा प्रहार; कोट्यवधींचा साठा जप्त, स्थानिक यंत्रणांवर प्रश्न

बार्शीत गुटखा रॅकेटवर पोलिसांचा मोठा प्रहार; कोट्यवधींचा साठा जप्त, स्थानिक यंत्रणांवर प्रश्न

नव्या पोलीस नेतृत्वाच्या कारवाईने शहरात खळबळ; “जे १५ दिवसांत झाले, ते वर्षानुवर्षे का झाले नाही?” अशी चर्चा

#बार्शी (विशेष प्रतिनिधी) : बार्शी शहर आणि तालुक्यात अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप होत असलेल्या अवैध गुटखा व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा गुटखा साठा जप्त केला आहे. प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईनंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून, स्थानिक पोलीस यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

माहितीनुसार, बालाजी कॉलनी परिसरातील एका ठिकाणी ड्रायफ्रूट व्यवसायाच्या आडून मोठ्या प्रमाणात गुटखा साठवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार टाकण्यात आलेल्या छाप्यात तीन पिकअप वाहनांमध्ये भरून नेण्यात येईल इतका मोठा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त करण्यात आल्याची चर्चा आहे. जप्त मुद्देमालाची अधिकृत आकडेवारी जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.

या कारवाईनंतर शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे पोलिस तपास आणि अधिकृत नोंदींनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध साठा सुरू असताना स्थानिक पातळीवर याची माहिती नव्हती का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. “जर बाहेरील अधिकाऱ्यांनी कमी कालावधीत माहिती गोळा करून कारवाई केली, तर स्थानिक यंत्रणांना याचा सुगावा का लागला नाही?” अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

माजी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर अंजना कृष्णा यांच्याकडे बार्शी उपविभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू केली असून, गुटखा, अवैध वाहतूक आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांवर सलग कारवाया सुरू असल्याने संबंधितांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून अवैध व्यवसायांच्या मुळापर्यंत जाऊन मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच, केवळ किरकोळ आरोपींवर गुन्हे दाखल न करता संपूर्ण साखळी उघड करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून अधिकृत माहिती समोर येण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.