“कोचांच्या सांगण्यावरून रोलर ओढत असताना आरवचा मृत्यू”; वडिलांच्या फिर्यादीवरून आयोजक व प्रशिक्षकांविरुद्ध गुन्हा

“कोचांच्या सांगण्यावरून रोलर ओढत असताना आरवचा मृत्यू”; वडिलांच्या फिर्यादीवरून आयोजक व प्रशिक्षकांविरुद्ध गुन्हा

 

बार्शी | प्रतिनिधी

 

बार्शी येथील शिवशक्ती मैदानावर आयोजित क्रिकेट समर कॅम्पदरम्यान १५ वर्षीय आरव उर्फ विरेन योगीराज चौधरी याच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या वडिलांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आयोजक आणि दोन प्रशिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, ३० मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ ते ७.३० वाजण्याच्या दरम्यान आरव हा क्रिकेट समर कॅम्पच्या सरावासाठी शिवशक्ती मैदानावर गेला होता. त्यावेळी मैदानावर उपस्थित असलेल्या मुलांकडून क्रिकेट पिचसाठी वापरण्यात येणारा जड रोलर ओढून घेतला जात होता. याचवेळी आरवचा तोल जाऊन तो खाली पडला आणि त्याच्या अंगावर रोलर गेल्याने तो गंभीर जखमी झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

 

घटनेनंतर आरवला तातडीने जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 

मृत मुलाचे वडील योगीराज चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, रोलर चालविण्यासाठी कोणताही प्रौढ व्यक्ती किंवा तांत्रिक कर्मचारी नियुक्त करण्यात आला नव्हता. तसेच क्रिकेट प्रशिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलांकडूनच रोलर ओढून घेतला जात होता. अशा परिस्थितीत अपघात होऊन गंभीर परिणाम होऊ शकतात याची जाणीव असूनही संबंधितांनी मुलांकडून हे काम करून घेतल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

 

या तक्रारीच्या आधारे मातृभूमी प्रतिष्ठानचे संतोष ठोंबरे तसेच प्रशिक्षक विवेक दुगम आणि अक्षय देबडवार यांच्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बाल न्याय कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश आंबादास गलगटे यांच्याकडे सोपविण्यात आला असून, घटनेच्या वेळी मैदानावरील परिस्थिती, सुरक्षा व्यवस्था, प्रशिक्षकांची भूमिका आणि फिर्यादीतील आरोपांची सत्यता याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.

 

दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे क्रीडा प्रशिक्षण शिबिरांमधील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

 

 

SVNewws

संपादक : समाधान विधाते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *