लेखणीसोबत सेवाभावाचा संगम; भगवंत महोत्सवात पत्रकार संघाची सात दिवस जलसेवा

लेखणीसोबत सेवाभावाचा संगम; भगवंत महोत्सवात पत्रकार संघाची सात दिवस जलसेवा

बार्शी:

श्री भगवंत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असताना, डिजिटल मीडिया पत्रकार संघ (असोसिएशन) यांनी सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित न राहता, संघाने सातही दिवस भाविकांसाठी अखंड पिण्याच्या पाण्याची सेवा उपलब्ध करून देत मानवतेचा संदेश दिला.

या जलसेवा उपक्रमाचा शुभारंभ ह.भ.प. श्री. जयवंत महाराज बोधले यांच्या हस्ते करण्यात आला. महोत्सवादरम्यान मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी संघाने पाण्याची योग्य आणि नियोजनबद्ध व्यवस्था केली होती. या उपक्रमामुळे हजारो भाविकांची तहान भागवली गेली.

पत्रकारिता ही केवळ माहिती देण्यापुरती मर्यादित नसून समाजाशी नाळ जपणारे माध्यम आहे, हे संघाने आपल्या कृतीतून दाखवून दिले. ‘लेखणीसोबतच मदतीचा हात’ या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संघाचे जिल्हा पश्चिम अध्यक्ष विनोद ननवरे, उपाध्यक्ष विजय कोरे, सहसचिव बाबासाहेब शिंदे, खजिनदार अजय पाटील, तसेच शहराध्यक्ष गणेश शिंदे, ग्रामीण अध्यक्ष संतोष कानगुडे, उपाध्यक्ष अभिजित शिंदे, खजिनदार समाधान विधाते आणि बालाजी देवकते यांनी विशेष परिश्रम घेतले.

महोत्सवाच्या सांगता प्रसंगी भाविक आणि आयोजकांनी पत्रकार संघाच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत आभार व्यक्त केले. या उपक्रमामुळे समाजात एक सकारात्मक संदेश पोहोचला असून, पत्रकार संघाने सेवाभावाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.