उंबरगे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी तसेच शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, या मागणीसाठी उंबरगे गावात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदच्या आवाहनाला गावातील मराठा समाजासह विविध जाती-धर्मातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मनोज जरांगे पाटील गेल्या काही वर्षांपासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलनाच्या माध्यमातून संघर्ष करत आहेत. या काळात मुंबईसह विविध ठिकाणी मोठी आंदोलने व उपोषणे करण्यात आली. शासनाकडून वेळोवेळी आश्वासने देऊनही मागण्यांची अपेक्षित पूर्तता झालेली नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
शासनाच्या धोरणाचा निषेध
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाने ठोस निर्णय घेऊन मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त करत आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचे उंबरगेतील मराठा बांधवांनी सांगितले.

दरम्यान, उंबरगे गावातून उद्या अंतरवाली सराटी येथे जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्या बांधवांना आवश्यक सहकार्य करण्याची तयारी ग्रामस्थांनी दर्शविली आहे.
“एक मराठा, लाख मराठा” अशा घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला.