बार्शीत १७ वर्षीय मुलीचा बालविवाह हाणून पाडला; पोलिसांच्या झटपट कारवाईने टळला अनर्थ
बार्शी | महाराष्ट्र डिजिटल न्यूज
बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हा विवाह रोखला. अवघ्या अर्ध्या तासात घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी मुलीची सुरक्षित सुटका केली आणि संभाव्य अनर्थ टाळला.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास बालविवाहाबाबतची माहिती व्हॉट्सअॅपद्वारे विशेष बाल पोलीस पथकाचे प्रमुख तथा उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर आणि बार्शी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांना प्राप्त झाली. माहितीची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले.
यानंतर पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली. पथकात अमोल माने, सचिन राऊत, उषा माने तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून बालविवाहाची प्रक्रिया थांबवली आणि अल्पवयीन मुलीचे संरक्षण सुनिश्चित केले.
या कारवाईमुळे एका मुलीचे शिक्षण, आरोग्य आणि भवितव्य सुरक्षित राहण्यास मदत झाली आहे. बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथेविरोधात पोलिसांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि तत्परता याबद्दल विविध स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, बाल कल्याण समितीच्या सदस्यांनीही या कारवाईचे स्वागत करत बालकांच्या हक्क आणि संरक्षणासाठी पोलिसांनी केलेले कार्य प्रशंसनीय असल्याचे म्हटले आहे.
“बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा आणि अशा घटनांची माहिती तात्काळ प्रशासनाला द्यावी,” असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.