“बार्शी बायपासवर पोलिसांची मोठी कारवाई; प्रतिबंधित मांगूर माशांची ३ टन वाहतूक उघड

“बार्शी बायपासवर पोलिसांची मोठी कारवाई; प्रतिबंधित मांगूर माशांची ३ टन वाहतूक उघड”

 

बार्शी तालुका पोलिसांनी रात्रगस्तीदरम्यान मोठी कारवाई करत शासनाने प्रतिबंधित केलेल्या मांगूर जातीच्या सुमारे ३ टन जिवंत माशांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला असून, दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

आगामी बकरी ईद तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी आणि वाहन तपासणी मोहीम सुरू आहे. त्याच अनुषंगाने दि. २२ मे २०२६ रोजी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास बार्शी तालुका पोलीस ठाणे अंतर्गत रात्रगस्त सुरू असताना परांडा चौक, नागोबाचीवाडी परिसरात एक अशोक लेलँड टेम्पो (क्रमांक KA 52 B 4687) संशयास्पद अवस्थेत आढळून आला.

 

पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव यांनी वाहन चालकाकडे चौकशी केली असता संशयास्पद उत्तरे मिळाल्याने वाहनाची तपासणी करण्यात आली. यावेळी टेम्पोच्या मागील भागात ताडपत्रीचा हौद तयार करून त्यामध्ये जिवंत मांगूर मासे वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.

 

मत्स्य व्यवसाय विभाग, सोलापूर यांच्याकडून पडताळणी केल्यानंतर संबंधित मासे हे पर्यावरण आणि स्थानिक माशांच्या प्रजातींसाठी धोकादायक मानल्या जाणाऱ्या प्रतिबंधित मांगूर जातीचे असल्याचे स्पष्ट झाले. भारत सरकारने या जातीच्या माशांचे संवर्धन, बीज उत्पादन, विक्री आणि वाहतूक यावर बंदी घातलेली आहे.

 

या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७५, ३(५) तसेच पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

ही कारवाई अतुल कुलकर्णी, विजय कबाडे आणि अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *