“बार्शी तालुका पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई; नियमबाह्य सुरू असलेल्या कला केंद्रावर छापा, ५० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त”
बार्शी तालुका पोलिसांनी अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान मोठी कारवाई करत लातूर रोडवरील एका कला केंद्रावर मध्यरात्री छापा टाकला. शासनाने निर्धारित केलेल्या वेळेनंतरही केंद्र सुरू ठेवून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ७२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत दि. २४ मे २०२६ रोजी पहाटे सुमारे १:३० वाजण्याच्या सुमारास बार्शी-लातूर मार्गावरील “लवंगी मिरची” नावाच्या कला केंद्रात नियमबाह्यरीत्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाड टाकली.
कारवाईदरम्यान कला केंद्रात नृत्य कार्यक्रम सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावेळी नृत्यांगना, ग्राहक, चालक आणि संबंधित मालक अशा एकूण ७२ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५० लाख १३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त साहित्यामध्ये रोख रक्कम, मोबाईल फोन, चारचाकी व दुचाकी वाहने, विविध साहित्य तसेच देशी दारूच्या बाटल्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
ही कारवाई अतुल कुलकर्णी, विजय कबाडे आणि अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, अवैध व्यवसायांविरोधातील मोहिम पुढेही कायम राहणार असल्याचे संकेत पोलिस प्रशासनाने दिले आहेत.