बार्शीत डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनचा पदग्रहण सोहळा उत्साहात; शहराध्यक्षपदी गणेश शिंदे, ग्रामीण अध्यक्षपदी संतोष कानगुडे
बार्शी | प्रतिनिधी, दि. ११
पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी कार्यरत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यांच्या डिजिटल विंगअंतर्गत कार्यरत डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनचा बार्शीत पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी शहराध्यक्षपदी गणेश शिंदे तर ग्रामीण अध्यक्षपदी संतोष कानगुडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मानाचे फेटे बांधून आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नियुक्तीपत्र स्विकारताना सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटन अधिक बळकट करण्याचा आणि पत्रकारांच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवण्याचा निर्धार व्यक्त केला. या सोहळ्यामुळे पत्रकारितेत नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी सोलापूर (पश्चिम) जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष विनोद ननवरे, उपाध्यक्ष विजय कोरे, सचिव संजय बोकेफोडे, सहसचिव बाबासाहेब शिंदे आणि खजिनदार अजय पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शहर व ग्रामीण कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
शहर कार्यकारिणी
शहराध्यक्ष गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अभिजीत शिंदे (उपाध्यक्ष), निलेश उबाळे (सचिव), अमीन गोरे (सहसचिव) आणि समाधान विधाते (खजिनदार) यांच्यासह सदस्य व मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात आली.
ग्रामीण कार्यकारिणी
ग्रामीण भागातील पत्रकारांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी संतोष कानगुडे यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांच्यासह काशिनाथ शिरसागर (उपाध्यक्ष), विश्वनाथ सोनवणे (सचिव), राजेश भोगे (सहसचिव) आणि बालाजी देवकते (खजिनदार) यांची निवड करण्यात आली.
महिला आघाडी
महिला आघाडी प्रमुखपदी राजश्री गवळी यांची निवड करण्यात आली असून, महिला पत्रकारांना संघटनेत अधिक बळकटी देण्याचा उद्देश यामागे असल्याचे सांगण्यात आले.
पत्रकारितेच्या मूल्यांवर भर
“पारदर्शकता, कर्तव्यनिष्ठा आणि निष्पक्षता” या पत्रकारितेच्या मूलभूत तत्त्वांचे पालन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. पत्रकारांच्या हक्कांसाठी एकत्रितपणे काम करण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात विविध विषयांवर चर्चा, पदाधिकाऱ्यांची मनोगते, फोटोसेशन आणि अल्पोपहाराचा कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालन निलेश उबाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अभिजीत शिंदे यांनी केले.