गणवेश-पुस्तकांसाठी शाळांची सक्ती बंद!
ठराविक दुकानातून खरेदीचा दबाव टाकल्यास कारवा….
विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पुस्तके किंवा इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर आता कारवाई होणार आहे. राज्यातील सर्व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना अशा सक्तीपासून दूर राहण्याचे स्पष्ट निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. शासनाच्या विद्यमान निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागाने नव्याने परिपत्रक जारी करत सर्व शिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत. पालकांकडून तक्रार प्राप्त झाल्यास तत्काळ चौकशी करून संबंधित शाळेवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय, कोणत्याही शाळेने विद्यार्थ्यांवर विशिष्ट खाजगी प्रकाशनांची पुस्तके खरेदी करण्याचे बंधन घालू नये, असेही आदेशात नमूद आहे. राज्य मंडळ, CBSE आणि ICSE शाळांनी मान्यताप्राप्त पाठ्यपुस्तकेच वापरावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे पालकांना शैक्षणिक साहित्य खरेदीत मोकळीक मिळणार असून शाळांकडून होणाऱ्या आर्थिक सक्तीला आळा बसणार आहे.